
माणदेश एक्सप्रेस न्युज | जयसिंगपूर :
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे शुक्रवारी (दि. १९) रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत केवळ आठ वर्षांच्या बालिकेच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. स्वराने अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन आरडाओरडा करत आपले वाचवले. या धाडसामुळे अपहरणकर्त्यांना पळ काढावा लागला असून, पोलिसांनी घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
नांदणीतील स्वरा शीतल देसाई (वय ८) ही शुक्रवारी संध्याकाळी आपल्या लहान भावासह दूध आणण्यासाठी डेअरीकडे जात होती. याचवेळी तीन ते चार जणांचा गट गावाबाहेरील अंधाऱ्या रस्त्यावर दबा धरून बसला होता. त्यापैकी एकाने अचानक पुढे येत स्वराचे तोंड दाबून तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या अचानक प्रकाराने स्वराचा लहान भाऊ घाबरून गेला.
परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात घेत स्वराने अपहरणकर्त्याच्या हाताला जोरात चावा घेतला आणि आरडाओरडा सुरू केला. तिच्या किंचाळण्याने परिसरातील काही नागरिक बाहेर धावून आले. लोकांना पाहताच अपहरणकर्ते शिरोळ मार्गाने अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर स्वरा सुखरूप घरी परतली. मात्र या घटनेमुळे तिचे आई-वडील काही काळ तणावाखाली होते. मुलीचे धाडस पाहून पालक व गावकरी थोडे सावरले असले तरी गावात मुलांच्या सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
स्वरा सध्या नांदणीतील पीएमश्री शहा तुळजाराम नागरदास कन्या विद्या मंदिर येथे इयत्ता दुसरीत शिकत आहे. शनिवारी सकाळी तिने आपल्या वर्गमित्रांसमोर संपूर्ण प्रसंग कथन केला. तिच्या धाडसाचे कौतुक करत शाळा व्यवस्थापनाने तिचा विशेष सत्कार करून गौरव केला.
घटनेनंतर शिरोळ पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप अपहरणकर्त्यांचा कोणताही ठोस धागा लागलेला नाही. गावात मुलांना पळवण्याचा प्रकार उघड झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपहरणकर्त्यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.