व्यापाऱ्यावर गोळीबार-लूट : चार आरोपी अटकेत; हल्लेखोर फरार

0
128

माणदेश एक्सप्रेस न्युज | नागपूर :
कडबी चौकाजवळ व्यापाऱ्यावर झालेल्या धक्कादायक गोळीबार-लुटीच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी चौघांना अटक करण्यात यश मिळवले आहे. मात्र प्रत्यक्ष हल्ला करणारे सहा सुपारी किलर अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू आहे. लुटीच्या या कटात अटक करण्यात आलेल्या स्थानिक आरोपींचा थेट सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.


जखमी व्यापाऱ्याचे नाव राजू दीपानी (रा. जरीपटका) असे असून ते डेटा फिडिंगसह व्यापारी व्यवहार करतात. त्यांचे दहा नंबर पुलाजवळ कार्यालय आहे. सोमवारी रात्री आठ वाजता ते कार्यालयातून बाहेर पडून दुचाकीने जात असताना चौकात दोन हल्लेखोरांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातातील स्प्रे पाहून दीपानी यांनी वेगाने निघण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी पिस्तुलातून सलग तीन गोळ्या झाडल्या.

दीपानी गंभीर जखमी होऊन खाली पडले. त्यांच्या जवळील ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग आरोपींनी हिसकावून घेतली व दुचाकीवरून पसार झाले.


घटनेनंतर पोलिसांनी दीपानी यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांची चौकशी केली. त्यातून मिळालेल्या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणात पोलिसांनी सिमरजितसिंग संतासिंग संधू (४२, श्री मुकसर साहेब, पंजाब), शेख हुसैन उर्फ जावेद शेख बशीर सवारे (३७, खरबी उमरेड मार्ग), सय्यद जिशान उर्फ सय्यद रहमान (३२, जाफरनगर) आणि अब्दुल नावेद अब्दुल जावेद (३३, सेंट्रल एव्हेन्यू) यांना अटक केली.

यापैकी नावेद हा दीपानी यांचा ओळखीचा असून, पूर्वी त्यांच्यासोबत व्यवहार केला होता. दीपानी यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोकड असते, याची माहिती त्याने सिमरजितसिंगला दिली. त्यानंतर सिमरजितसिंगने उत्तर प्रदेशातील सहा सुपारी किलरना बोलावून हल्ल्याची सुपारी दिली.


हल्लेखोर दोन दिवस आधी नागपुरात दाखल झाले. त्यांनी शहरातून दोन दुचाकी चोरल्या व त्यावरूनच दीपानी यांच्यावर गोळीबार करून लूट केली. घटना घडल्यानंतर आरोपींपैकी सहा जण वाडीच्या दिशेने पळून गेले, तर चौघेजण नांदेडकडे निघाले असताना पोलिसांच्या सापळ्यात अडकले.


या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असली तरी अधिकृत पातळीवर अद्याप काही माहिती दिलेली नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र नाव न छापण्याच्या अटीवर चौघांना अटक झाल्याचे वृत्त मान्य केले. फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here