ट्रेलरला धडकून कारचा चेंदामेंदा; कुलगुरू आणि पत्नीचा मृत्यू, चालक गंभीर

0
355

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर :
रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी (वय ५२) आणि त्यांची पत्नी बदामी देवी (वय ३५) यांचा एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. शनिवारी पहाटे घडलेल्या या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

वाराणसी-गोरखपूर महामार्गावर भीषण धडक

मिळालेल्या माहितीनुसार, हरेराम त्रिपाठी हे पत्नीसमवेत मूळगाव कुशीनगर जिल्ह्यातील चकिया बाघुजघाट येथे जात होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास (५.४०) त्यांची इनोव्हा कार वाराणसी-गोरखपूर चौपदरी महामार्गावर महू येथील दोहरीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उभ्या असलेल्या ट्रेलरवर जाऊन आदळली. ट्रेलर टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. मात्र, त्रिपाठी यांच्या कारने मोठ्या वेगाने जाऊन ट्रेलरला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भाग अक्षरशः चकनाचूर झाला.

जागीच प्राण गमावले

या अपघातात हरेराम त्रिपाठी आणि त्यांची पत्नी बदामी देवी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात पाठवले.

चालक गंभीर जखमी

या अपघातात कार चालक वैभव मिश्रा (वय ३५) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने दोहरीघाट येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार व ट्रेलर जप्त केला आहे.

चालकाला आली झोप, म्हणून त्रिपाठी स्वतःच बसले स्टिअरिंगवर

अपघातामागील धक्कादायक बाब म्हणजे हा प्रवास सततचा असल्याने चालक वैभव मिश्रा याला झोप येऊ लागली. त्याने त्रिपाठी यांना याबाबत सांगितले असता, त्यांनी स्वतः कार चालवण्याचा निर्णय घेतला. चालक मागच्या सीटवर गेला आणि त्रिपाठींची पत्नी समोरच्या सीटवर बसली. मात्र, काही अंतर पुढे गेल्यावर हा अपघात घडला.

वैभव मिश्रा याने पोलिसांना सांगितले की,

“मी सलग प्रवास करत असल्याने झोप येऊ लागली होती. त्यामुळे कुलगुरूंनी मला आराम करायला सांगितले. ते स्वतः कार चालवत होते. मात्र वाराणसी-गोरखपूर महामार्गावर उभा असलेला ट्रेलर दिसला नाही आणि कार त्यावर जाऊन धडकली.”

शैक्षणिक क्षेत्रात हळहळ

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत असलेले हरेराम त्रिपाठी हे अभ्यासू, अभ्यासक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here