
माणदेश एक्सप्रेस न्युज/ नागपूर : नागपूरची शहाना फातिमा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्यकौशल्याचा ठसा उमटवत शिकागोमधील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठात सायबर सुरक्षा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सन्मान पटकावला आहे. या विद्यापीठाने निवडलेल्या सात श्रेष्ठ विद्यार्थ्यांमध्ये शहानाचा समावेश करण्यात आला आहे.
शहानाने सायबर फॉरेन्सिक्स आणि सिक्युरिटी या विषयात मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. तिच्या कार्यक्षमतेची दखल घेत विद्यापीठाने तिला विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान दिलं आहे.
शहानाला या क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे मिळाली होती. “पूर्वी इंधन असलेली राष्ट्रं समृद्ध मानली जात, आता माहिती व डेटा असलेली राष्ट्रं समृद्ध ठरतील,” हे त्यांचं वाक्य ऐकून शहानाने सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात प्रवेश केला, असं ती सांगते.
शहानाला २०२४ मध्ये युरोपमधील कोसोवो येथे ‘थ्री फोल्डर्स’ नावाच्या मार्केटिंग कंपनीसाठी सायबरसुरक्षा पायाभूत रचना विकसित करण्याची संधीही मिळाली होती. तिच्या नेतृत्वाखाली चार जणांच्या टीमने ही यंत्रणा यशस्वीपणे राबवली.
शहानाच्या या यशाबद्दल नागपूरकरांमध्ये अभिमान व्यक्त केला जात असून, तिचं कौतुक होत आहे. तरुणींना प्रेरणा देणारी ही कहाणी इतरांसाठीही दिशादर्शक ठरत आहे.