एकाच डम्परमुळे दोन अपघात; १२ तासांत दोन मृत्यू, तिघेजण जखमी

0
185

माणदेश एक्सप्रेस न्यूज | विटा :
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा.) गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला निष्काळजीपणे उभ्या केलेल्या एका नादुरुस्त डम्परमुळे केवळ १२ तासांच्या अंतरात दोन भीषण अपघात घडले. या दोन्ही अपघातांत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच डम्परमुळे हे अपघात घडल्याने रस्ते सुरक्षा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८:३० वाजता विटा ते आळसंद मार्गावर खंबाळे गावच्या हद्दीतील चक्रधारी यंत्रमाग कारखान्याजवळ हा डम्पर (एमएच १० सीआर ८७०७) नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता.
त्याच वेळी महेंद्र पांडुरंग शितोळे (वय ३५, रा. शिवाजीनगर, विटा) हे दुचाकीवरून (एमएच १० डीई ७६९९) विट्याकडे येत होते. अचानक डम्पर नजरेस न पडल्याने त्यांची दुचाकी थेट डम्परच्या मागील उजव्या भागावर आदळली. धडकेचा जोर एवढा जबरदस्त होता की, शितोळे यांचा जागीच मृत्यू झाला.


सकाळच्या या अपघाताची धक्कादायक घटना ताजी असतानाच, त्याच दिवशी रात्री सुमारे ८:३० वाजता पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा भीषण अपघात घडला. आळसंदकडून विट्याकडे येत असलेली चारचाकी (एमएच १० एजी २७३४) अंधारात डम्पर न दिसल्याने थेट पाठीमागून डम्परवर जाऊन आदळली. धडकेनंतर ही चारचाकी समोरून येणाऱ्या मोटारीला (एमएच १६ डीजी ५६७०) धडकली.

या अपघातात चारचाकी चालक आस्लम गुलाब मुलाणी (रा. आळसंद) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबातील वहिदा आस्लम मुलाणी, अल्ताफ आस्लम मुलाणी आणि तन्जिला सरफराज मुजावर (सर्व रा. आळसंद) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या धडकेत चारचाकी व मोटार दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.


या दुहेरी अपघातानंतर पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. विटा पोलिस ठाण्यात या अपघातांची नोंद करण्यात आली असून डम्पर (एमएच १० सीआर ८७०७) निष्काळजीपणे रस्त्यावर उभा करणाऱ्या


डम्पर चालकाने वाहन नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा केले, मात्र त्यावर पार्किंग लाईट, रेडिएटर चेतावणी दिवे किंवा दिशादर्शक फलक लावले नव्हते. यामुळेच सलग दोन अपघात घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
“अशा प्रकारे रस्त्यावर निष्काळजीपणे सोडलेली वाहने थेट मृत्यूला आमंत्रण देतात. अशा चालकांविरुद्ध कठोर कारवाई केली नाही तर भविष्यातही असे अपघात घडत राहतील,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.


खंबाळे गावच्या रस्त्यावर घडलेले हे अपघात रस्ते सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उभे करतात. रस्त्यावर नादुरुस्त वाहने उभी राहिल्यास ती अपघातांना कारणीभूत ठरत असून, प्रशासनाने अशा निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here