
माणदेश एक्सप्रेस न्यूज| बीड –
शहागड (जि. जालना) येथून गेवराईत खरेदीसाठी आलेल्या ३० वर्षीय विवाहित महिलेवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (९ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, घटनेमागचे कारण अजूनही गूढच आहे.
घटनेचा थरार
खामगाव (ता. गेवराई) येथील माहेरी आलेली शीतल कटमिल्ला पवार (वय ३०) ही मैत्रिणीसोबत गेवराईत खरेदीसाठी गेली होती. तोंडाला कापड बांधलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी दोघींना मारहाण केली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या पळू लागल्या, मात्र पळत असतानाच शीतलवर गोळीबार करण्यात आला. गोळी तिच्या छातीत घुसली, तसेच हात-पायांवर मारहाणीच्या जखमाही झाल्या.
जखमी अवस्थेत तिला रात्री १२ वाजेच्या सुमारास बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. एक्स-रे तपासणीत छातीत गोळी अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक उपचारानंतर तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
पीडितेचा मौन
या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिस पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. मात्र, जबाब नोंदविण्याच्या वेळी शीतल पवार यांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. “माझा, पतीचा आणि सवतीचा कौटुंबिक वाद मिटविताना माझ्या सवतीच्या भावाने व बहिणीने मारहाण केली. त्यावेळी माझा पतीही हजर होता. मात्र, गोळी कोणी मारली हे सांगू शकत नाही,” असे तिने सांगितले.
सदर महिला शहागड येथे पतीसह वास्तव्यास असून, माहेर खामगाव येथे आहे. पतीने दोन लग्न केले असून, दोन्ही पत्नींमध्ये पूर्वीपासून वाद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोळीबार नेमका कुठे?
गेवराई पोलिसांनी शहरात किंवा उपजिल्हा रुग्णालयात गोळीबाराची नोंद नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गोळीबार नेमका कुठे झाला याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, घटनेनंतर घाटी रुग्णालयात नातेवाईक पोहोचताच एकच गोंधळ उडाला. गोळीबार घाटीतच झाला, अशी चर्चा रंगली. बेगमपुरा पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत पीडितेस पाच पोलिसांचे संरक्षण दिले व नातेवाईकांना बाहेर काढले.
शहरात खळबळ
घाटीतून पोलिस नियंत्रण कक्षाला गोळीबाराचा संदेश पोहोचताच शहरातील पोलिस पथके विविध भागांत रवाना झाली. चौकशीत शहरात गोळीबार झाला नसल्याचे निष्पन्न झाल्यावरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
वैद्यकीय स्थिती
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीचे तुकडे झाल्याने शस्त्रक्रिया प्रकृती स्थिर झाल्यानंतरच होणार आहे. तोपर्यंत पीडितेला पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे. शीतल पवार यांनी सुट्टी झाल्यावर सविस्तर जबाब देण्याचे आश्वासन पोलिसांना दिले आहे.
या प्रकरणात गोळीबार कौटुंबिक वादाचा भाग आहे की काही वेगळे कारण दडले आहे, याचा तपास सुरू असून, घटनेभोवतीचे गूढ आणखी गडद झाले आहे.


