
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली :
कॉमेडियन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मुनव्वर फारुकी यांच्या हत्येचा कट उधळण्यात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी पहाटे जैतपूर-कालिंदी कुंज रस्त्यावर पोलिस आणि गुंडांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर गोल्डी बरार गँगचे दोन शार्पशूटर्स पोलिसांच्या हाती लागले. या दोघांची नावे राहुल (पानीपत, हरियाणा) आणि साहील (भिवानी, हरियाणा) अशी आहेत.
पोलिसांच्या विशेष पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी पहाटे सापळा रचला. यादरम्यान आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन्ही आरोपी जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून शस्त्रसाठा व मोटारसायकल जप्त केली आहे.
पोलिस तपासानुसार, हे दोन्ही शूटर रोहित गोदरा-गोल्डी बरार टोळी व विरेंद्र चारण गँगच्या सांगण्यावरून काम करत होते. त्यांनी फारुकीच्या हत्येची योजना आखली होती आणि मुंबई व बंगळुरू येथे त्याची रेकीही केली होती.
पोलिसांनी सांगितले की, वेळेत कारवाई केल्यामुळे फारुकीवरील जीवघेणा हल्ला टळला.
राहुल (पानीपत, हरियाणा) : डिसेंबर 2024 मध्ये यमुनानगर येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडात सहभागी. त्यानंतर तो फरार होता.
साहील (भिवानी, हरियाणा) : टोळीतील सक्रिय सदस्य, शस्त्र पुरवठा आणि गोपनीय रेकीचे काम पाहत होता.
दोघांवरही याआधी अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, दिल्ली पोलिसांनी त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
कुख्यात गँगस्टर गोल्डी बरार आणि त्याचा सहकारी रोहित गोदरा हे परदेशातून भारतातील गँग ऑपरेट करत असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. या टोळीने गेल्या काही महिन्यांत अनेक मोठ्या व्यक्तींवर हल्ल्याचे कट रचले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुनव्वर फारुकीचा टार्गेट लावण्यात आला होता.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की,
“मुनव्वर फारुकीची हत्या करण्याचा कट उधळण्यात आला आहे. आरोपींनी त्याच्या हालचालींची सविस्तर रेकी केली होती. परंतु, वेळेत कारवाई करून त्यांची योजना हाणून पाडली. तपास सुरू असून गँगच्या इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे.”
या घटनेमुळे पुन्हा एकदा गोल्डी बरार गँगचे आंतरराज्यीय नेटवर्क उघडकीस आले असून, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कलाकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.