मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक भिडले : प्रभादेवी परिसरात तणाव

0
75

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मुंबई महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान चढत चालले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उभे राहिलेले ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे दिसून आला. काल (दि. ११ सप्टेंबर) शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभादेवी परिसरात दोन्ही गटांतील शिवसैनिक आमने-सामने आले.


प्रभादेवी सर्कल परिसरातील सुशोभिकरणाच्या कामाच्या वर्क ऑर्डरवरून वाद निर्माण झाला. दोन्ही गटांनी “काम आमच्याकडेच आहे” असा दावा करत एकमेकांवर शब्दांचे बाण सोडले. सुरुवातीला किरकोळ वादावादी झाली, परंतु नंतर ती ढकलाढकली व धक्काबुककीपर्यंत पोहोचली.


या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार समाधान सरवणकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“या कामासाठी वर्क ऑर्डर आमच्याकडे आहे. आम्ही निधी मिळवून हे काम सुरू केले आहे. मात्र, काही लोक आम्ही केलेल्या कामावर रंगरंगोटी करून आपली नावे लावत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही,” असे ते म्हणाले.


तर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा आरोप असा आहे की, “मुंबईत आम्हीच मूळ शिवसैनिक आहोत. आमच्या कार्यकाळात सुरु झालेल्या अनेक प्रकल्पांवर आता शिंदे गट आपले नाव लावण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक जनतेची दिशाभूल केली जात आहे.”


वाद वाढताच प्रभादेवी पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी दोन्ही गटांना बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.


मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करणे हे दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेचं युद्ध आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आधीच परस्परांमध्ये कडवा संघर्ष झाल्यानंतर, आता महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने वातावरण आणखी तापत चाललं आहे. प्रभादेवीतील हा संघर्ष त्या मोठ्या लढाईची झलक असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here