
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मनसेसोबत युतीबाबत थेट उत्तर देण्याचे टाळले असले तरी, त्यांनी केलेली सूचक विधाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहेत.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी, “मनसेसोबत जायचं की महाविकास आघाडीसोबत युती करायची, याचा निर्णय उद्धव ठाकरे लवकरच घेतील. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असे स्पष्ट केले. त्यामुळे मनसेसोबत युतीबाबत अंतिम निर्णय अद्याप लंबित असून, तो खुद्द उद्धव ठाकरेच जाहीर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाविकास आघाडीत एकत्र असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही सहकार्याचा सूर राखला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राऊत म्हणाले, “प्रत्येक शहरात वेगवेगळ्या राजकीय समीकरणांचा विचार करून निर्णय घेतला जाईल. कुठे काँग्रेससोबत जायचं, कुठे राष्ट्रवादीसोबत – हे कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक स्थिती बघून ठरवू.”
दरम्यान, राऊत यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. “महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वॉर्डांची रचना सोयीची केली जात आहे. भाजप आपल्या हितासाठी प्रभाग फोडण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक आयोगाने कोणाचाही दबाव झेलू नये. त्यांना ‘जागल्याच्या’ भूमिकेत राहावं लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे मनसेसोबत वाढते स्नेहबंध, कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक भावना आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या राजकीय हालचाली यामुळे मुंबई महापालिकेतील संभाव्य युतीचे गणित अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. लवकरच उद्धव ठाकरे यांच्याकडून यावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.