
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
राज्यभरातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अनेक महिला लाभार्थ्यांच्या खात्यात अजून हप्ता जमा न झाल्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण होते. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सन्मान निधीसाठी तब्बल ३४४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून, सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. तटकरे यांनी सोशल मीडियावरूनच या निर्णयाची माहिती दिली.
त्यांनी लिहिलं की –
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे.”
या योजनेअंतर्गत २ कोटी ४८ लाख महिला लाभार्थी नोंदणीकृत आहेत. राज्यातील माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी या योजनेची सुरुवात झाली असून, हा निधी थेट आधार संलग्नित बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
मात्र, या प्रक्रियेत काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. नियम व निकष न पाळता लाभ घेणाऱ्या हजारो महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
“महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होईल,” असे आश्वासनही मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.