Flipkart त्यांचा सर्वात मोठा सेल ‘बिग बिलियन डेज 2024’ दरम्यान देशात एक लाख नवे रोजगार निर्माण करणार आहे. या दरम्यान, गोदामं, दुकानं आणि डिलिव्हरीसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांवर भरती केली जाईल. दिवाळीपूर्वीच्या या सेलमध्ये फ्लिपकार्टनं अनेक जागांवर भरती जाहीर केली आहे.
Flipkart त्यांच्या आगामी ‘बिग बिलियन डेज 2024’ (Big Billion Days Sale 2024) साठी मोठी भरती करणार आहे. कंपनीनं याबाबत बोलताना सांगितलं की, फ्लिपकार्ट संपूर्ण देशभरात अनेक गोदामं उघडली आहेत. कंपनीकडून त्यांचा सर्वात मोठा सेल बिग बिलियन डेची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे.
एक लाख नव्या रोजगारांच्या संधी
दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट सणासुदीच्या काळात असलेल्या त्यांचा सर्वात मोठा सेल ‘द बिग बिलियन डेज 2024’ च्या दरम्यान देशभरात जवळपास एक लाखांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. फ्लिपकार्टनं बुधवारी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, येत्या बिग बिलियन डेपूर्वी त्यांनी नऊ शहरांमध्ये 11 नवी गोदामं सुरू केली आहेत. ज्यामुळे देशात या केंद्रांची संख्या वाढून 83 झाली आहे.
वॉलमार्ट ग्रुपची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टनं पुढे बोलताना सांगितलं की, फ्लिपकार्ट देशभरात आपल्या सप्लाय चेन अंतर्गत एक लाखांहून अधिक नवे रोजगार उपलब्ध करून देणार आहे. या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामात ऑपरेशनल क्षमता मजबूत करणं आणि आर्थिक विकासाला गती देणं, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल.
‘या’ क्षेत्रांत सर्वाधिक नोकऱ्या
फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, नव्या नोकऱ्या सप्लाय चेनच्या विविध क्षेत्रात असतील. यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजर, वेअरहाऊस असोसिएट्स, लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर, किराणा भागीदार आणि डिलिव्हरी ड्रायव्हर्स यांचा समावेश आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनी सणांदरम्यान आयोजित केलेल्या विक्रीतून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या अनेकदा हंगामी स्वरूपाच्या असतात. Flipkart नं सांगितलं की, ते सणासुदीच्या आधी नव्या कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करेल.