
महाकुंभ २०२५ मेळ्यात माळा विकणारी मोनालिसा एका रात्रीत स्टार बनली आणि आता तिचं पहिलं गाणं ‘सादगी’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मोनालिसाचा हा म्युझिक व्हिडिओ १४ जून रोजी जगभरात रिलीज झाला असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मोनालिसाच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि निरागसतेने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
या गाण्यात मोनालिसा आणि गायक उत्कर्ष सिंग यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री विशेष लक्षवेधी ठरली आहे. उत्कर्ष सिंग यांच्या यूट्यूब चॅनेलवर हा गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. गाण्याच्या सुरुवातीला मोनालिसा पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट लेहेंग्यात दिसते आणि पुढे ती लाल लेहेंग्यातही मनमोहक भासते. “उसकी आंखों से ही रोशन है सुबह का नूर, उसकी पलकों में ही ढलता है रात का गुरूर…” हे बोल असलेलं हे रोमँटिक गाणं रसिकांना भावत आहे.
मोनालिसा ही मूळची मध्य प्रदेशातील महेश्वर येथील असून महाकुंभ मेळ्यात माळा विकत असताना तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती रातोरात लोकप्रिय झाली. त्या एका फोटोने तिचं नशीब पालटलं आणि आता ती लक्झरी जीवनशैली जगते आहे.
चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, “याला म्हणतात खरं नशीब”, तर अनेकांनी मोनालिसाच्या सौंदर्याचं आणि साधेपणाचं कौतुक केलं आहे. गाण्याचा टीझर आणि पडद्यामागील क्लिपही प्रेक्षकांनी डोळे भरून पाहिल्या असून, मोनालिसाच्या पहिल्याच गाण्याला मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे.