
माणदेश एक्स्प्रेस/ मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (रविवार) नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसादाराबद्दल भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न राऊतांना माध्यमांकडून विचारण्यात आला होता. यावर संजय राऊतांनी तो नेता बहुतेक महाराष्ट्रातील असेल असे म्हटले आहे. इतकेच नाही तर हा नेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असेही राऊत म्हणाले आहेत.
“या क्षणी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय. म्हणूनच मोदींना बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघाची चर्चा ही बंद दाराआड असते. ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाहीत. तरीही काही संकेत असतात, ते संकेत स्पष्ट आहेत. पुढील नेता संघ ठरवेल आणि बहुतेक तो महाराष्ट्रातील असेल,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या या दाव्यावर भारतीय जनता पक्षाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.