
माणदेश एक्सप्रेस न्युज | शिराळा :
कुणबी दाखल्यासाठी मोडी लिपीतील जुने पुरावे शोधणे, त्यांचे वाचन, भाषांतर आणि प्रतिज्ञापत्र तयार करणे या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे आतापर्यंत नागरिकांना प्रचंड वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र सांगली जिल्ह्यातील शिराळा तहसील प्रशासनाने या सर्व अडचणींवर मात करून राज्यात प्रथमच एक सुसंगत आणि नागरिकाभिमुख प्रणाली विकसित केली आहे. या उपक्रमामुळे कुणबी दाखला घेण्यासाठी नागरिकांना लागणारी धावपळ आता पूर्णपणे थांबणार आहे.
आतापर्यंत कुणबी दाखल्यासाठी नागरिकांना आपल्या पूर्वजांच्या मोडी लिपीतील जुने दस्तऐवज शोधावे लागत होते. त्यासाठी तज्ज्ञांना बोलावून नोंदी वाचून घ्याव्या लागत, नंतर त्याचे मराठीत भाषांतर करून प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत असे. या प्रक्रियेत आर्थिक भुर्दंड तर बसतच होता, पण योग्य तज्ज्ञ मिळवणे हीसुद्धा मोठी अडचण होती.
ही समस्या ओळखून तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी पुढाकार घेतला. नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, अस्लम जमादार, महसूल सहायक संजय देवकर, दीपक चव्हाण, राजू आगळे, रोशन कांबळे, गौरी पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शिराळा तालुक्यातील सर्व जुन्या मोडी लिपीतील नोंदी एकत्र केल्या.
या नोंदींना गाववार वर्गीकरण करून १८ सुसज्ज रजिस्टर तयार करण्यात आले. प्रत्येक रजिस्टरवर गावाचे नाव, आत अनुक्रमणिका, पान क्रमांक, नोंदीचा क्रमांक, संबंधित व्यक्तीचा जन्म-मृत्यू दिनांक आणि जातीचा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे.
या प्रत्येक नोंदीखाली मोडी लिपी वाचणाऱ्या तज्ज्ञाची सही असून मागे मूळ पुराव्याची प्रत जोडलेली आहे. त्यामुळे आता नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन आपल्या गावाच्या रजिस्टरमधून अधिकृत प्रत मिळेल. वेगळे भाषांतर, वाचन किंवा प्रतिज्ञापत्राची आवश्यकता नाही. हा पुरावा राज्यभर ग्राह्य धरला जाणार आहे.
आतापर्यंत ५४४ मोडी लिपीतील पुस्तके तपासली
११,१०१ नोंदींमधून ८,५८३ कुणबी नोंदी मिळाल्या
२३७ मराठी पुस्तकांतील ११,३५५ नोंदी तपासल्या, त्यातून ४,८५२ कुणबी नोंदी मिळाल्या
एकूण मिळून १३,४३५ कुणबी नोंदी शोधण्यात यश
“नागरिकांना मोडी लिपीतील कुणबी नोंदीचा दाखला मिळवण्यासाठी होणारी धावपळ आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आम्ही गावपातळीवर हे रजिस्टर तयार केले आहेत. याचा नागरिकांना खूप मोठा फायदा होत आहे.”
– शामला खोत-पाटील, तहसीलदार, शिराळा
या अभिनव उपक्रमामुळे शिराळा तहसील कार्यालय हे राज्यातील पहिले असे कार्यालय ठरले आहे जिथे मोडी लिपीतील कुणबी पुरावे एकाच छताखाली, सुटसुटीत व नागरिकाभिमुख पद्धतीने उपलब्ध होत आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणावर वाचणार आहेत.