
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जत तालुक्याच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर यश आलं असून जतला स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मंजूर झाले आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर सांगली येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास ‘MH-59’ कोडचा शिल्ड देऊन सत्कार केला.
जतसारख्या सीमेवरील ग्रामीण भागासाठी स्वतंत्र RTO कार्यालय ही मोठी सुविधा ठरणार आहे. यामुळे वाहन नोंदणी, परवाने, तपासणी आदी कामांसाठी नागरिकांना सांगली, मिरज किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक स्तरावरच सर्व प्रक्रिया पार पाडता येणार असल्याने वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्याच्या मागासलेपणाची दखल घेत हे कार्यालय मंजूर केल्याबद्दल आमदार पडळकर यांनी त्यांचे आभार मानले. सांगली येथे पोलीस मुख्यालयात इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी या समारंभात आमदार गोपीचंद पडळकर यांनी MH-59 या नवीन RTO कोडचा सन्मानचिन्ह असलेला खास शिल्ड देत फडणवीस यांचा गौरव केला.
यावेळी आमदार पडळकर म्हणाले, “जत तालुक्यातील जनतेसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे जत तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून अनेक ठिकाणी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.