
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मिरज :
अंधश्रद्धा आणि आमिष यांचा खेळ अजूनही समाजात सुरू असल्याचे स्पष्ट करणारी धक्कादायक घटना मिरज तालुक्यात उघडकीस आली आहे. मूल होण्यासाठी औषध देतो, अशा बहाण्याने एका दाम्पत्याला फसवून भामट्याने तब्बल 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या प्रकारामुळे गावभर एकच खळबळ उडाली असून, ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
फिर्यादी दाम्पत्य मिरज तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. त्यांना एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून, “तुम्हाला मूल होत नाही, माझ्याकडे खास औषध आहे. त्यापूर्वी एक विशेष विधी करावा लागेल,” असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून दाम्पत्याने त्या व्यक्तीला घरी बोलावले.
भामटा घरी आल्यानंतर त्याने पती-पत्नीस घरातील देव्हाऱ्यासमोर बसवले. विधी करण्यासाठी अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून ब्लाऊज पिसवर ठेवण्याचे निर्देश त्याने दिले. त्यानंतर ते दागिने पितळी हंड्यात ठेवले असल्याचा बहाणा करत भामटा म्हणाला, “मी आता मंदिरात जाऊन येतो, तुम्ही दोघांनी वीस मिनिटे उठायचे नाही.”
निर्देशानुसार दाम्पत्य शांतपणे जागेवर बसले. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने संशय आला. दाम्पत्याने शोधाशोध केली असता, घरातील हंड्यातील दागिने गायब असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे दाम्पत्याच्या पायाखालची जमीन सरकली.
शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फिर्याद नोंदवून संशयिताचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी तपासाचे जाळे आवळले आहे. पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यासह, आरोपीने इतरत्र अशाच प्रकारे फसवणूक केली आहे का, याची चौकशी सुरू केली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोक कसे फसवले जातात, हे समोर आले आहे. मूल होण्यासाठी औषध, ताईत, विधी अशा खोट्या बहाण्यांना बळी पडल्यामुळे केवळ आर्थिक तोटा नाही, तर मानसिक आघातही दाम्पत्याला सहन करावा लागत आहे.