
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मिरज :
अनंतचतुर्दशीनिमित्त निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मिरज आणि अंकली येथे दोन ठिकाणी चाकूहल्ल्याच्या घटना घडल्या. या हल्ल्यांमध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिरज येथील आझाद सिकंदर पठाण आणि अंकली येथील शीतल धनपाल पाटील अशी जखमींची नावे आहेत.
मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचत असताना सराईत गुन्हेगार आझाद सिकंदर पठाण याच्यावर पूर्ववैमनस्यातून संशयितांनी चाकूहल्ला केला. पठाणच्या छातीजवळ चाकूचा वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आझाद पठाण याच्यावर यापूर्वीही चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, मिरज शहर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, अंकली येथे विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यास विरोध केल्याने वाद निर्माण झाला. या वादातून तिघांनी शीतल धनपाल पाटील याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी विकास बंडू घळगे (वय 35), क्षितिज शशिकांत कांबळे (वय 28) आणि आदित्य शंकर घळगे (वय 22, सर्व रा. अंकली) या तिघांना अटक केली आहे.
दोन्ही घटनांमुळे विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहाला गालबोट लागले असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरज आणि अंकली पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.