
माणदेश एक्सप्रेस न्यूज | जत :
जतपूर्व भागातील एका गावात अल्पवयीन मुलीवर विनयभंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात प्रताप महिंद्रा सावंत (रा. सालेकीरी, ता. जत) या युवकावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, गावातील 15 वर्षीय मुलगी 8 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास शाळेसाठी घराबाहेर पडली होती. या दरम्यान रस्त्यावर तिच्या पाठीमागून प्रताप सावंत हा मोटरसायकलवरून आला. त्याने मुलीचा हात धरत, अयोग्य शब्द वापरत, जबरदस्तीने तिला मोटरसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या प्रतिकारामुळे संशयिताने तेथून पळ काढला.
या घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलीने घरी येऊन पालकांना प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी जत पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवून प्रताप सावंत याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो) अंतर्गत कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सध्या संशयित फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास जत पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी गाव परिसरासह आजूबाजूच्या भागात गस्त वाढवण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.