मंत्री शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; महापालिका निवडणुकीत भाजप – मनसे एकत्र येणार?

0
119

माणदेश एक्सप्रेस/मुंबई: मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत युतीबाबत भाजपचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्याला काही तास उलटत नाही तोच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे महापालिकेसाठी भाजप आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला तोंड फुटले.

 

लोकसभा, विधानसभेत महायुतीसोबत जाण्याची मनसेची तयारी होती. बाळा नांदगावकर यांच्यासाठी दक्षिण मुंबई लोकसभेची जागा मागितली होती. पण, धनुष्यबाणावर लढण्याचा शिंदेसेनेचा प्रस्ताव मनसेने नाकारला. विधानसभेत अमित ठाकरे यांच्याविरोधात शिंदेसेनेने उमेदवार दिला होता.

 

मंत्री शेलार आणि राज ठाकरे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर शेलार यांनी मंत्री झाल्यांनतर त्यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात या दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मनसेसोबत चर्चा सुरू झाल्या. तोपर्यंत वेळ निघून गेल्यामुळे संवादात कमतरता राहिली होती. परंतु, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा व्हावी, असे मनसेनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.