
माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई : अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आली आहे. खातेवाटपाचा आदेश मिळताच भुजबळ मुंबईकडे रवाना झाले. “हे माझेच खाते होते, आता ते परत आले आहे. गेल्या वेळी प्रत्येक गावात धान्य पोहोचवलं होतं. यावेळीही पारदर्शकता राखण्यासाठी काम करणार,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आपली नाराजी अनेकदा स्पष्टपणे मांडली होती. अखेर मंगळवारी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या जबाबदारीची घोषणा झाली. हे खाते यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे होतं. त्यांचा राजीनामा झाल्यानंतर खाते काही काळ अजित पवारांकडे होतं.
ओबीसी समाजातील प्रभावी नेता म्हणून ओळख असलेल्या भुजबळ यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय भूमिका देण्यात आली आहे. खाते मिळाल्यानंतर भुजबळ यांनी तातडीने मुंबई गाठली असून सचिव व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाला सुरुवात केली आहे.