
कोल्हापूर | माणदेश एक्सप्रेस न्यूज :
महाराष्ट्रात महायुती सरकारकडून सुरु असलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “विरोधक जाणीवपूर्वक ‘लाडकी बहीण योजना बंद होणार’ अशा अफवा पसरवत आहेत; मात्र वास्तव वेगळे आहे. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज (शुक्रवार) सायंकाळपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यासाठीचे काम वेगाने सुरु आहे,” असे त्या म्हणाल्या.
गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, ही योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिचा लाभ सातत्याने मिळत राहील.
पालकमंत्रीपदावरील चर्चा आणि विकास निधी
रायगड व नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरील चर्चेविषयी बोलताना तटकरे म्हणाल्या, “पालकमंत्रिपद हे सर्वस्व नाही. योग्य वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्णय होईल. माझ्याकडे सध्या हे पद नसले तरी विकास निधी वितरणात कोणताही अन्याय होणार नाही. महायुतीमध्ये चांगला समन्वय आहे आणि त्या आधारे निधीचे नियोजन व वितरण सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून कोणतीही रस्सीखेच नाही.”
त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून काम करत असून जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहे.
महिलांसाठी ‘आदिशक्ती’ अभियान
मंत्री तटकरे यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरु होणाऱ्या आदिशक्ती अभियानाचीही माहिती दिली. “राज्यातील प्रत्येक गावात आदिशक्ती समिती स्थापन होईल. त्यात महिला प्रमुख असतील. हुंडाबंदी, हुंडाबळी, महिला अत्याचार अशा गंभीर सामाजिक समस्यांवर जनजागृती करण्याबरोबरच राज्य सरकारच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवल्या जातील,” असे त्यांनी सांगितले.
या समित्यांच्या माध्यमातून ८ मार्च रोजी महिला विशेष ग्रामसभा घेण्यात येईल. यात महिलांच्या प्रश्नांवर चर्चा, शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि स्थानिक समस्यांवर तोडगे काढले जातील.
महिलांसाठी दिलासा देणारी घोषणा
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार असल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे. सरकारने ही योजना सातत्याने चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.