
माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकाने रंग फेकल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दादर येथील शिवाजी पार्क परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना सकाळी साधारण ६.१० वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. पुतळ्यावर लाल रंग फेकून त्याचे विद्रुपीकरण करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत देखील घटनास्थळी दाखल झाले.
पुतळ्याची स्वच्छता करून पुन्हा तो पूर्ववत करण्यात आला असला, तरी या घटनेमुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमू लागले असून, परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, आरोपींची ओळख पटली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
खासदार अनिल देसाई यांनी या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी म्हटलं –
“हे कृत्य करणारे भेकड आणि समाजकंटक आहेत. त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल. ही घटना म्हणजे सरकारच्या अपयशाचे द्योतक आहे. आज मुंबई सुरक्षित नाही, मग सरकार नेमकं काय करतंय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मीनाताई ठाकरे या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री होत. शिवाजी पार्क परिसरात त्यांचा पुतळा उभारण्यात आला असून, शिवसैनिकांसाठी तो श्रद्धास्थान मानला जातो. अशा पुतळ्याचा अवमान झाल्याने ठाकरे गटात संतापाची लाट उसळली आहे.