
जयपूर : आयपीएलच्या रंगतदार मोसमात काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव करत थेट Qualifier 1 मध्ये प्रवेश मिळवला, तर मुंबईसाठी आता प्लेऑफ्समधील मार्ग अधिक खडतर झाला आहे. या पराभवामुळे मुंबईचा संघ Eliminator सामना खेळणार असून, अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याची त्यांची संधी फसली आहे.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८४ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकून संघाला सावरले, मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पंजाबकडून चांगल्या गोलंदाजीसमोर मुंबईची फळी कोसळली.
पंजाब किंग्जने १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगची विकेट लवकर गमावली, मात्र त्यानंतर प्रियंश आर्य (६२) आणि जॉश इंग्लिस (७३) या जोडीने १०९ धावांची भक्कम भागीदारी करत सामन्यावर पकड मिळवली. शेवटी कर्णधार श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत अवघ्या १६ चेंडूत २६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. सामना ९ चेंडू आणि ७ विकेट्स राखून जिंकण्यात पंजाबला यश आले.
मुंबई इंडियन्सकडून बुमराह आणि सँटनर वगळता कोणत्याच गोलंदाजाला प्रभाव टाकता आला नाही. पंजाबच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत प्लेऑफमधील पहिल्या दोन स्थानांतील आपले स्थान निश्चित केले.
२०१४ नंतर प्रथमच पंजाब किंग्जचा संघ पुन्हा एकदा प्लेऑफमध्ये पोहोचला असून, या विजयासह ते थेट Qualifier 1 मध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ बनला आहे.