
माणदेश एक्स्प्रेस/पुणे : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला. त्यामुळे काही भागांत पावसाचा अंदाज आहे.
जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला. सोलापूर अद्यापही ४० अंशाच्या पुढेच आहे. पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांत पावसाचा अंदाज आहे.