
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी उपेंद्र गुणाजी पावसकर (वय अंदाजे ४५) या व्यक्तीला अटक केली आहे.
काल (बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास प्रभादेवी परिसरातील त्याच्या घराबाहेर कारवाई करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत पावसकरनेच रंग फेकल्याची कबुली दिली असून, या कृत्याचे ठोस कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.
प्रभादेवीतील रहिवाशांच्या माहितीनुसार, पावसकर मागील तीन वर्षांपासून एकटाच राहत होता. त्याचा स्वभाव विक्षिप्त असून, त्याची मानसिक स्थितीही स्थिर नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. घटनेनंतर काहींनी त्याचा संबंध बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाशी जोडण्याचा प्रयत्न केला; मात्र, स्थानिकांनी ही बाब फेटाळून लावत, “तो सतत विचित्र वागायचा, त्यामुळेच अशा प्रकारचे कृत्य त्याच्याकडून घडले असावे,” अशी माहिती दिली.
या घटनेनंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसकरवर भारतीय दंड संहितेतील कलम 298 (धार्मिक भावना दुखावणे किंवा जाणूनबुजून विटंबना करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्याची पुढील चौकशी सुरू असून, त्याची मानसिक स्थिती लक्षात घेता वैद्यकीय तपासणीही केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मीनाताई ठाकरे यांच्यावर झालेल्या या विटंबनेच्या प्रकाराने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठाकरे कुटुंबाशी जोडलेली भावना लक्षात घेता या घटनेकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. काही स्थानिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत “ही केवळ पुतळ्याची नव्हे, तर संपूर्ण शिवसैनिकांच्या भावनांची विटंबना आहे” असेही म्हटले आहे.
पुढील काही दिवसांत या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिस तपासातून पावसकरच्या कृत्यामागील खरी कारणमीमांसा लवकरच स्पष्ट होणार आहे.