
अलास्का : अलास्का समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या पॅसिफिक महासागरात एका वाहन वाहून नेणाऱ्या प्रचंड जहाजाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ‘मॉर्निंग मिडास’ असे या जहाजाचे नाव असून, यामध्ये तब्बल ३,००० हून अधिक वाहने, त्यापैकी ७५० इलेक्ट्रिक कार होत्या. या घटनेमुळे सागरी वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहन सुरक्षेबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
ही दुर्घटना रविवारी घडली. अलास्का कोस्ट गार्डच्या माहितीनुसार, जहाजावर आग लागल्याचा आपत्कालीन संदेश प्राप्त झाला. या जहाजावर २२ क्रू मेंबर्स होते. सुदैवाने, एका खासगी जहाजाच्या मदतीने त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे.
सध्या हे जहाज अलास्काच्या अडाक प्रदेशापासून ५४७ किलोमीटर नैऋत्य दिशेला स्थित आहे. जहाज अजूनही समुद्रात तरंगत आहे, पण त्यामध्ये आगीचा धूर सतत निघताना दिसत आहे. जहाजात असलेल्या इलेक्ट्रिक कार्समुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे.
ईव्ही बॅटऱ्यांमुळे आग?
या जहाजात असलेल्या ७५० इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बहुतेकांमध्ये लिथियम-आयन बॅटऱ्या आहेत. या बॅटऱ्या सामान्यतः सुरक्षित मानल्या जातात, मात्र त्यांना जर झटका बसला, किंवा उष्णता वाढली तर स्फोट किंवा आग लागण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या आगीमागे इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्यांमुळे शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये ईव्ही वाहने वाहून नेणाऱ्या जहाजांना आग लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लिथियम-आयन बॅटऱ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आगीवर नियंत्रण नाही
रविवारी आग लागल्यानंतरही अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले नव्हते. कोस्ट गार्डने दिलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये ६०० फूट लांबीच्या जहाजातून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. सोमवारपर्यंत बचाव कार्य सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पर्यावरण आणि वाहतूक सुरक्षेवर परिणाम
ही दुर्घटना केवळ एका जहाजापुरती मर्यादित नसून, ती इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. ईव्ही तंत्रज्ञान जसे प्रगत होत आहे, तसतसे त्याचे संभाव्य धोके आणि त्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना यावर भर देणे आवश्यक झाले आहे.