
माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काल सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. राष्ट्रीय उद्यानाच्या लगतच असणाऱ्या दहिसर परिसरात धुलीवंदनाच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी काही तळीराम एकत्र जमले होते. यातील एका तळीरामाने ही आग लावल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय उद्यानात आगीचे मोठे लोट दिसू लागले. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या आणि राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.