हॉरर सिनेमांचा स्वतःचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये ‘स्त्री २’, ‘मुंज्या’ या हॉरर सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच एक हॉरर-कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. ‘भूत बंगला’ असं अक्षयच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्याने या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांच्या मनात हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याबाबत उत्सुकता आहे. अशातच आता ‘भूत बंगला’ चित्रपटाबाबत एक महत्त्वाची अपडेटसमोर आली आहे.
अक्षय कुमारच्या या सिनेमात अभिनेत्री तबूदेखील आहे. आता या सिनेमात आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर मिथिला पालकर आहे. मिथिला पालकरला खिलाडी कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. मिथिला पालकर या चित्रपटात अक्षय कुमारच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मिथिला पालकरनेही चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. मिथिला या चित्रपटासाठी २५ दिवस शूटिंग करणार आहे.
‘भूल भूलैय्या’ सिनेमानंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी अनेक वर्षांनी एकत्र काम करणार आहे. या जोडीने हेरा फेरी, भूल भुलैया, गरम मसाला, भागम भाग आणि खट्टा मीठा असे काही उत्तम चित्रपट दिले आहेत, त्यामुळे या चित्रपटाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.
अक्षय कुमार ‘भूत बंगला’ निमित्त अनेक वर्षांनी हॉरर कॉमेडी सिनेमात झळकणार आहे. अक्षय, तबू आणि मिथिला व्यतिरिक्त या सिनेमात परेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि वामिका गब्बी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर, आणि एकता आर. कपूर यांनी केली आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.