
माणदेश एक्सप्रेस न्यूज | कडेगाव :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या लढ्याला आता निर्णायक वळण मिळाले असून, राज्यभरातील गावोगावातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करत आहेत. अंतरवली सराटी येथून सुरू झालेल्या या भव्य मोर्चाच्या हाकेला कडेगाव तालुक्यातील बांधवांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातून निघालेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले असून, भगव्या झेंड्यांनी संपूर्ण कडेगाव भगवामय झाले.
“आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे”, “मनोज जरांगे पाटील तुम्ह आगे बढो – हम तुम्हारे साथ है”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या घोषणांनी कडेगाव शहर अक्षरशः दणाणून गेले. गावोगावी जमलेले बांधव एकवटले आणि एका अखंड लाटेच्या स्वरूपात मुंबईकडे रवाना झाले. काही बांधव कराडमार्गे थेट मुंबईकडे रवाना झाले तर उर्वरितांनी कडेगावच्या मध्यवर्ती भागातून रॅलीच्या स्वरूपात प्रवास सुरू केला.
हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, खांद्यावर भगवा टॉवेल अशा परंपरागत परंतु जाज्वल्य वेशभूषेत निघालेल्या मराठा बांधवांचा उत्साह पाहून शहरातील नागरिक थबकून गेले. रॅलीच्या मार्गावर उभे असलेल्या नागरिकांनी जल्लोषात घोषणा देत या लढ्याला पाठिंबा दर्शवला. संपूर्ण कडेगाव परिसर “चलो मुंबई! आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही” या निर्धाराने घुमून गेला.
या रॅलीत महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता. भगव्या नऊवारी साड्यांमध्ये आणि हातात भगवे पताके घेऊन महिलांनी रॅलीत सहभाग घेतला. “आमच्या मुलांच्या भविष्यासाठी लढा थांबवणार नाही” असा ठाम निर्धार व्यक्त करत
रॅलीत सर्वाधिक सहभाग तरुणांचा होता. मोटारसायकलस्वार तरुण भगवे झेंडे फडकावत पुढे जात होते, तर पायपीट करणाऱ्या बांधवांच्या तोंडून सतत एकच घोषणांचा आवाज येत होता –
“आरक्षण मिळाल्याशिवाय घरी परतणार नाही.”
रॅलीमुळे शहरात प्रचंड गर्दी झाल्याने पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. रॅली मार्गावर वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र, शांततेत आणि शिस्तीत काढण्यात आलेल्या या रॅलीत कुठलाही अनुशासनभंग झाला नाही.
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्टपासून मुंबईत सुरू होणाऱ्या या निर्णायक आंदोलनात लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे. कडेगावसह संपूर्ण जिल्ह्यातून निघालेल्या या बांधवांच्या लाटेने आंदोलनाला अधिक बळ मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या ऐतिहासिक लढ्याला ग्रामीण भागातून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा हे आंदोलन किती व्यापक झाले आहे, याची साक्ष देत आहे.