
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई/अहिल्यानगर :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडक देत बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. एकीकडे राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम सुरू असताना जरांगे मुंबईत आल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी चिंता शासनाला आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत या दोन मंत्र्यांना जरांगे यांच्या भेटीसाठी पाठवले जाणार आहे. हे दोन्ही मंत्री जरांगे यांना भेटून, सध्या मुंबईत येऊन आंदोलन करू नये असा सरकारचा संदेश देणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही भेट अहिल्यानगर किंवा पुण्यात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उदय सामंत अल्पावधीतच अहिल्यानगरमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विखे पाटील आणि सामंत जरांगेंची भेट घेतल्यानंतर या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार, तसेच सरकारतर्फे कोणता ठोस प्रस्ताव मांडला जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच करत आहेत. ताफ्यातील कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे असून, आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली जात आहे. सध्या जरांगेंचा ताफा पैठण फाट्याजवळ पोहोचला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने जरांगेंना मुंबईत प्रवेशास मनाई केली असून, जर आंदोलन करायचे असेल तर ठाणे किंवा नवी मुंबई परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश सरकारला दिले आहेत. मात्र, जरांगे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “काहीही झाले तरी आम्ही मुंबईत जाणारच. गरज पडली तर आम्ही पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावू,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारने नुकतेच 26 ऑगस्ट रोजी हैदराबाद गॅझेटविषयी निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयानंतर मराठा समाजात नाराजी पसरली असून, जरांगे यांनी थेट आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरांगे मुंबईत आले तर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. त्यामुळेच सरकारने दोन मंत्र्यांना संदेश घेऊन जरांगेंची भेट घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
विखे पाटील व उदय सामंत जरांगेंशी चर्चा करणार
जरांगेंना मुंबईत न येता ठाणे-नवी मुंबई परिसरात आंदोलन करावे, अशी विनंती होणार
सरकारकडून नेमका कोणता ठोस प्रस्ताव दिला जाणार?
जरांगे सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की आझाद मैदानावर धडक देणार?
या सर्व प्रश्नांवरून पुढील काही तासांतच राज्याच्या राजकारणात आणि मराठा समाजाच्या आंदोलनात मोठे चित्र स्पष्ट होणार आहे.