
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णायक टप्प्यावर पोहोचलेले आंदोलन आता मुंबईच्या आझाद मैदानावर धगधगत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सकाळी 10.30 वाजता आमरण उपोषणाचा एल्गार पुकारला. “गोळ्या घालून मारलं तरी मागे हटणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी ठाम भूमिका जाहीर केली. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे, ही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणली.
सरकारकडून आता पहिली प्रतिक्रिया नोंदवली गेली असून, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने आपली मागणी लेखी स्वरूपात शासनाकडे सादर केली आहे. हे निवेदन सरकारला प्राप्त झाले असून त्यावर विचार सुरू असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. ते स्वतः मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्याने या निवेदनावर लवकरच समितीची बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“सरकारने हा प्रश्न कधीच प्रतिष्ठेचा केलेला नाही. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारची पूर्ण सहानुभूती आहे. विशेष म्हणजे, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर कोणी यापासून वंचित राहिले असेल, तर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडून योग्य कार्यवाही केली जाईल,” असे विखे पाटील म्हणाले.
तसेच, “ज्या नवीन मागण्या असतील त्यावरही चर्चा आणि विचार होईल. चर्चेतूनच तोडगा निघू शकतो. आरक्षणावर सर्वांचा तोडगा निघावा हीच भावना आहे,” असे ते म्हणाले.
आझाद मैदान हे आता मराठा आंदोलनाचे नवे रणांगण ठरत आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताना आंदोलनास परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले. पण एक दिवसाची दिलेली परवानगी अपुरी आहे, ती वाढवावी, अशी मागणी त्यांनी स्पष्ट शब्दांत केली.
“जर सरकारने अडथळा आणला, तर मुंबईत अजून लाखो मराठा दाखल होतील,” असा इशाराही त्यांनी दिला. सध्या आझाद मैदान आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले असून, पुढील काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतील वातावरण सध्या पूर्णपणे मराठा आंदोलनाच्या छायेत आले आहे. गावोगावातून मराठा समाजाचे बांधव मुंबईकडे निघाले आहेत. भगवा झेंडा आणि ‘आरक्षण हक्काचा’ घोषणा देत आंदोलक मैदान गाजवत आहेत. “आझाद मैदानावरूनच आता अंतिम तोडगा निघालाच पाहिजे,” अशी एकमुखी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे.
मुंबई पोलिस आणि प्रशासनासाठी हा मोठा ताणाचा विषय बनला आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. उपोषण दीर्घकाळ चालले तर आरोग्य आणि वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रबिंदूवर आला आहे. सरकार चर्चेला तयार असल्याचे दाखवते आहे, पण ठोस तोडगा निघेपर्यंत आझाद मैदानाचे आंदोलन किती उग्र होणार, हेच सध्या महाराष्ट्राचे राजकीय समीकरण ठरवणारे ठरणार आहे.