SEBC, EWS नंतर आता ओबीसी… मराठा आरक्षण मागणीवर भुजबळ आक्रमक

0
120

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा चिघळत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला वेग आला असताना ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थतेतूनच लातूर जिल्ह्यातील भरत महादेव कराड (वय ३५, रा. वांगदरी, ता. रेणापूर) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेने ओबीसी समाजात भीतीचे वातावरण पसरले असून, त्यावरून राज्याचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त करत मराठा समाजातील शिक्षित नेते व लोकप्रतिनिधींना थेट सवाल केले आहेत.


प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले,

“मी मराठा समाजातील अशिक्षित लोकांना प्रश्न विचारत नाही. पण जे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार शिक्षित आहेत, त्यांना मी विचारतो की नेमकं तुम्हाला काय हवं आहे? आरक्षण म्हणजे काय हे ज्यांना समजतं, त्यांनी या प्रश्नाला उत्तर द्यावं.”

ते पुढे म्हणाले,

“जेव्हा ५० टक्के आरक्षण आणि ५० टक्के ओपन असा समतोल होता, तेव्हा ब्राह्मण समाज केवळ २-३ टक्के होता. पण मराठा समाज जवळपास ५० टक्के होता. त्यानंतर झालेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण दिले. त्यात मराठा समाज एकटाच होता. त्यानंतरही स्वतंत्र आरक्षणाची मागणी करून SEBC मध्ये पुन्हा १० टक्के आरक्षण घेतले. आता पुन्हा ओबीसीमध्ये सामील व्हायचे म्हणून आंदोलन सुरू आहे. हा दबाव टाकण्याचा प्रकार आहे.”


भुजबळ यांनी थेट प्रश्न विचारत मराठा समाजातील माजी व सध्याचे लोकप्रतिनिधींना आव्हान दिले.

“तुम्हाला SEBC १० टक्के नको का? ते रद्द करायचं का? EWS मध्ये तुम्ही ८०-९० टक्के आहात, तेही तुम्हाला नको आहे का? खुल्या वर्गातून जे लाभ घेत आहात, तेही नको आहेत का? मग सांगा, तुम्हाला फक्त ओबीसींचंच आरक्षण हवं आहे, असं का? हे स्पष्टपणे जाहीर करा.”


मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी वाढत असताना ओबीसी समाजातील विविध घटकांमध्ये अस्वस्थता व तीव्र नाराजी दिसून येत आहे. लातूरमधील आत्महत्येच्या घटनेने ही भीती अधिक गडद झाली आहे. ओबीसी समाजाला वाटतंय की त्यांचं विद्यमान आरक्षण धोक्यात येईल. त्यामुळे हा वाद आता अधिक गंभीर होत चालला आहे.


छगन भुजबळ यांच्या या आक्रमक विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आधीच संवेदनशील आहे. त्यात ओबीसींच्या चिंता आणि मराठा समाजाच्या सातत्याने वाढणाऱ्या मागण्या यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.


👉 संपूर्ण प्रकरणाचा सारांश :

  • मराठा समाजाला EWS आणि SEBC अंतर्गत मिळालेले १०-१० टक्के आरक्षण.

  • तरीसुद्धा ओबीसी प्रवर्गात आरक्षणाची नवी मागणी.

  • यामुळे ओबीसी समाजात वाढलेली अस्वस्थता.

  • लातूरमध्ये एका तरुणाची आत्महत्या.

  • छगन भुजबळांचा थेट सवाल – “मराठा समाजाला नेमकं काय हवं आहे?”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here