
मुंबई : “जिंकलो होsss राजेहो… तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो”, अशा घोषणा देत आझाद मैदानावर मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. “एक मराठा, लाख मराठा”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “गणपती बाप्पा मोरया” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याची घोषणा झाल्यानंतर वातावरणात उत्साहाचं वातावरण होतं.
आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यासपीठावरूनच सरकारनं कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, याची माहिती दिली. या वेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जरांगे पाटील यांनी सांगितलं की, मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी सरकारला देण्यात आला आहे. “हैद्राबाद गॅजेट” तात्काळ लागू करण्याची मागणी त्यांनी अधोरेखित केली. यावर उपसमितीनं मान्यता दिली असून पुढील काही तासांत शासन आदेश निघेल, असं सरकारनं आश्वासन दिलं आहे.
“वाशीप्रमाणे आपली फसवणूक होऊ नये म्हणून सरकारकडून हमी घेणं गरजेचं आहे,” असं सांगून जरांगे पाटील यांनी व्यासपीठावरच शिवेंद्रराजेंकडून अंमलबजावणीची हमी घेतली.
सरकारनं मान्य केलेल्या पाच महत्त्वाच्या मागण्या :
हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी – पुढील काही तासांत शासन आदेश.
सातारा संस्थान गॅजेट – 15 दिवसांत कायदेशीर तपासणी करून अंमलबजावणी.
सातारा गॅजेट लागू करण्याचा शासन आदेश – एक महिन्यात होणार.
आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेणे – सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय.
शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी व आर्थिक मदत – शासन आदेश लवकरच.
जरांगे पाटील यांनी आंदोलनाला मिळालेल्या पाठिंब्यासाठी सर्व मराठा बांधवांचे आभार मानले. “आपण शांततेत आंदोलन करून सरकारला पटवून दिलं, आता सरकारनं ही मागण्या मान्य करून आंदोलनाची ताकद ओळखली आहे,” असं ते म्हणाले.