
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आटपाडी
आटपाडी तालुक्यातील मापटेमळा या गावातील ग्रामस्थांनी गावाचा ग्रामपंचायतीत समावेश ठेवावा, या मागणीसाठी आता प्रसंगी कठोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात चंद्रकांत काळे यांनी माणदेश एक्सप्रेसशी बोलताना प्रशासनाच्या व राजकीय दुर्लक्षाचा खरपूस समाचार घेतला.
▪️ नगरपंचायतमध्ये समावेशासाठी राजकीय डावपेच?
मुलतः 1416 हेक्टर क्षेत्रफळाचे मापटेमळा हे गाव आटपाडी नगरपंचायतच्या हद्दीत आणण्यासाठी तीन वर्षांपूर्वी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. उलट राजकीय दबावामुळे व काही इच्छुकांच्या स्वार्थी हितसंबंधांमुळे ही प्रक्रिया अडकवून ठेवण्यात आली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
▪️ ठराव आमचा नसतानाही आटपाडी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव?
ग्रामस्थांचा स्पष्ट आक्षेप असा की, मापटेमळा गावाचा नगरपंचायतमध्ये समावेश करण्यासाठी कोणताही ग्रामसभा ठराव पारित झाला नव्हता, तरीही आटपाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचांनी एकतर्फी ठराव पाठवला. यामुळे गावकरी प्रचंड नाराज झाले आहेत.
▪️ मापटेमळा शेवटच्या टोकावर – 8 किमी दूर अंतर
गावकरी सांगतात की, मापटेमळा हे आटपाडी नगरपंचायतीच्या मुख्य भागापासून तब्बल ८ किमी अंतरावर आहे. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या नगरपंचायतीमध्ये समावेश करणे अव्यवहारी असून गावाची ओळख, संस्कृती व गरजा ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतात.
▪️ ‘कोणीही वाली नाही’ – ग्रामस्थांचा संताप
सध्या मापटेमळ्याचे कोणतेही राजकीय नेतृत्व नाही, त्यामुळे ग्रामस्थांना सातत्याने अन्याय सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीतच गावाचा समावेश राहावा, यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, त्यावर अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. यावेळी रघुनाथ यादव,अरविंद जाधव, रेवण जाधव, मनोज माळी, राजाराम माळी, अनुज माळी, सर्जेराव गावंड, दगडू काळे,अविनाश काळे, मच्छिंद्र चपणे , दत्तात्रय चपणे, वीरेंद्र माळी, भारत मोहिते, विजय माळी, सिताराम मेटकरी, दत्तात्रय व्हणमाने, अप्पासाहेब व्हनमाने, अजित व्हनमाने, विकासं माळी, स्वामी गोडसे ,सुभाष माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
▪️ लवकर निर्णय न झाल्यास मोठे आंदोलन
यासंदर्भात चंद्रकांत काळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “आम्ही मापटेमळा ग्रामपंचायत म्हणूनच मानतो. जर वेळेत योग्य निर्णय झाला नाही, तर संपूर्ण गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.”
🟩 मागण्या:
मापटेमळा गावाचा ग्रामपंचायतीमध्ये कायम समावेश राहावा.
नगरपंचायतीत समावेशाच्या ठरावाची चौकशी करावी.
प्रशासनाने याबाबत त्वरीत लेखी उत्तर द्यावे.
राजकीय दबावामुळे होणारे अन्याय थांबवावेत.
🗣️ “आमचं गाव नगरपंचायतीत कुठून आलं? ठराव आमचा नाही, मग प्रशासनाने आमची मर्जी न विचारता निर्णय का घेतला? हे आम्ही खपवून घेणार नाही. आता आम्ही चुप बसणार नाही.” – शिवाजी बनसोडे, मापटेमळा ग्रामस्थ