
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या आघाडीवर असलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘चलो मुंबई’चा नारा देत 29 ऑगस्टला मुंबईकडे कूच केल्यानंतर ते सध्या आझाद मैदानावर ठिय्या देऊन उपोषण करत आहेत. आज (1 सप्टेंबर) त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, या पार्श्वभूमीवर जरांगेंनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
जरांगेंच्या आंदोलनाला राज्यातील मराठा समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो गावांतील तरुण, शेतकरी, महिला आणि वृद्ध मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. परिणामी आझाद मैदान भगव्या झेंड्यांनी आणि समाजबांधवांच्या घोषणांनी दणाणून गेले आहे. मराठा समाजाच्या हक्कासाठी सुरू झालेलं हे आंदोलन आता राज्याच्या राजकारणासाठी मोठं डोकेदुखी ठरत आहे.
सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा ठपका ठेवत मनोज जरांगे यांनी आजपासून आपल्या उपोषणाचा निर्णय अधिक कठोर केला आहे. आतापर्यंत ते केवळ अन्नत्यागावर होते, मात्र आता त्यांनी पाणी पिणे देखील थांबवले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनाचं गांभीर्य आणखी वाढलं असून, त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आधीच ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच जरांगे यांनी घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे सरकारवर त्वरित भूमिका स्पष्ट करण्याचा दबाव वाढला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधील वरिष्ठ मंत्री सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र आत्तापर्यंत सरकारकडून कोणताही ठोस निर्णय जाहीर झालेला नाही.
जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले असून, अनेक ठिकाणी आंदोलनं आणि रास्ता रोको सुरू झाले आहेत. तासगाव, परळी, जळगाव, अहमदनगर अशा अनेक भागांतून मदतीचे ट्रक आणि साहित्य मुंबईला पोहोचवले जात आहे.