दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलनं आंदोलन करणार; जरांगेंचा सरकारला इशारा, पुन्हा एल्गार

0
128

माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मोठं राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला कडक इशारा दिला असून, “दसऱ्यानंतर वेगळ्या पद्धतीनं आंदोलन होणार” असा इशारा त्यांनी दिला आहे.

जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, आरक्षण प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची फसवणूक सहन केली जाणार नाही. समाजाची फसवणूक झाली, तर आंदोलनाची दिशा आणि पद्धत वेगळी असेल. “सरकारला पुन्हा मान खाली घालावी लागेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.


जरांगे यांनी यावेळी सरकारला थेट आव्हान देत सांगितलं की, आरक्षण प्रक्रियेतील निकष आणि तांत्रिक बाबींबाबत सरकारने श्वेतपत्रिका प्रकाशित करावी. मराठा समाजाला काय मिळणार, किती टक्के आरक्षणाचा हक्क आहे, याबाबत पारदर्शकता दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.


जरांगे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आरक्षण धोरणातील विसंगतीवरही ताशेरे ओढले. केंद्र सरकार एक भूमिका मांडते तर राज्य वेगळी दिशा घेते, असं सांगत त्यांनी दोन्ही सरकारांवर अविश्वास व्यक्त केला. “मराठा समाजाचा संयम संपत चाललाय. आरक्षण मिळालंच पाहिजे, अन्यथा पुन्हा मोठा एल्गार उभा राहील,” असा इशारा त्यांनी दिला.


जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दसऱ्यानंतर सुरू होऊ शकणाऱ्या नव्या आंदोलनामुळे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहील, अशी चर्चा सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here