“अतिवृष्टीग्रस्तांना आधार द्या; नाहीतर महाराष्ट्र ठप्प करू : जरांगेंची गर्जना”

0
94

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | धाराशिव :
अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तत्काळ मदत द्यावी, अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. बुधवारी (२३ सप्टेंबर) त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील चिंचपुर ढगे व पिंपळगाव परिसराला भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली.


जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, नुकसानभरपाईसाठी सरकारने कुठलाही निकष लावू नये. “जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत द्यावी. पंचनाम्यांमध्ये ५० टक्के, ६० टक्के असे टप्पे करू नका. शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, म्हणून त्यांना १०० टक्के भरपाई मिळालीच पाहिजे,” असे ते म्हणाले.


सरकारने नुकसानीच्या मदतीसाठी लावलेल्या अव्यवहार्य अटींवरही जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जनावरांचे मृतदेह दाखवावे लागतात, ही क्रूर अट तातडीने रद्द करा. शेतकरी आधीच हतबल आहेत, त्यांना यातून अधिक मानसिक त्रास देऊ नका,” अशी मागणी त्यांनी केली.


पिंपळगावातील शेतकरी आत्माराम दातखिळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या वेदना जरांगे यांच्यापुढे मांडल्या. पिकांचे संपूर्ण नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांची पडझड या दुहेरी-तिहेरी संकटामुळे शेतकरी कुटुंबांवर अक्षरशः पर्वत कोसळला आहे. “आम्हाला तातडीने मदत हवी, नाहीतर जगणे अशक्य होईल,” असा टाहो शेतकऱ्यांनी फोडला.


या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी सांगितले की, “सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. तात्काळ मदतकार्य सुरू करून पीडितांना आधार द्यावा. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार आहे. पण जर मदत न मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.”


जरांगे यांच्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची वेदना व्यक्त केली. उभ्या पिकांचे नुकसान, घरांवर कोसळलेला धोका, जनावरांचे मृत्यू आणि भविष्याबाबतची चिंता – या साऱ्या कारणांनी शेतकरी कुटुंबांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. जरांगे यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकारवर दबाव आणण्याचे आश्वासन दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here