
माणदेश एक्सप्रेस न्युज | हिंगोली
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भेंडेगावात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दोन गट आमने-सामने आले असून, करुंदा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भेंडेगावातील एका व्यक्तीने मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून सोशल मीडियावर ती पसरवली. या पोस्टची माहिती समोर आल्यानंतर जरांगे पाटील यांचे समर्थक थेट भेंडेगावात दाखल झाले आणि संबंधित व्यक्तीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही गटात जोरदार बाचाबाची झाली. काही वेळ गावात तणावाचे वातावरण पसरले होते.
स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून करुंदा पोलिसांनी तात्काळ गावात पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर जरांगे समर्थक मोठ्या संख्येने करुंदा पोलिस ठाण्यात जमले आणि आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. हिंगोलीचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे स्वतः ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करत असताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय मान्य करून घेतला होता. या गॅझेटविरोधात दाखल झालेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. यामुळे मराठा समाजात मोठा दिलासा मिळाल्याचे वातावरण आहे.
याबाबत पहिली प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले,
“आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. गोरगरिबांच्या बाजूने न्यायदेवता उभी राहते. सरकारनंतर न्यायदेवता हीच गोरगरिबांचा आधार आहे. सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे मांडावीच लागणार आहे.”
मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करत असून, त्यांच्या नेतृत्वामुळे या आंदोलनाला राज्यभरात वेगळी गती मिळाली आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयामुळे सध्या मराठा समाजात समाधानाचे वातावरण असले तरी सोशल मीडियावरून होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टमुळे वेळोवेळी तणाव निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंगोली पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले असून, कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.