
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता आपले आंदोलन मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत येऊन आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती. यामुळे राज्य सरकार अडचणीत आले असून, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना प्रवेशबंदी घातली होती. मात्र मोठ्या चर्चेनंतर अखेर जरांगे यांना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पण ही परवानगी मिळताना त्यावर एकूण आठ अटी लादण्यात आल्या आहेत. या अटींपैकी काही सामान्य स्वरूपाच्या असल्या तरी एक महत्त्वाची अट मात्र जरांगे यांच्या आंदोलनाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांत या आंदोलनावरून राज्यातील राजकीय तापमान आणखी चढण्याची चिन्हे आहेत.
नेमक्या कोणत्या अटी घालण्यात आल्या?
अट क्रमांक 1 :
आंदोलनाला एकावेळी फक्त एका दिवसासाठीच परवानगी दिली जाईल. शनिवारी, रविवारी तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी दिली जाणार नाही.
अट क्रमांक 2 :
आंदोलनासाठी येणाऱ्या वाहनांवर कडक निर्बंध असतील. आंदोलकांची सर्व वाहने ईस्टर्न फ्री वे मार्गाने वाडीबंदर येथे यावीत. आझाद मैदानात केवळ मुख्य आंदोलकासोबत 5 वाहनेच जाऊ शकतील. उर्वरित वाहनांना शिवडी, कॉटनग्रीन आदी परिसरात पोलीसांच्या मार्गदर्शनानुसार पार्किंगसाठी वळवण्यात येईल.
अट क्रमांक 3 :
आंदोलनासाठी कमाल 5000 आंदोलकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. आझाद मैदानातील 7000 स्क्वेअर मीटर क्षेत्र आंदोलनासाठी उपलब्ध असेल. मात्र त्यातच इतर आंदोलकांनाही परवानगी देण्यात आलेली असल्याने जागेची टंचाई निर्माण होऊ शकते.
अट क्रमांक 4 :
प्रतिबंधित क्षेत्राकडे मोर्चा किंवा रॅली नेण्यास सक्त मनाई असेल.
अट क्रमांक 5 :
ध्वनीक्षेपक, प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणाऱ्या उपकरणांचा वापर परवानगीशिवाय करता येणार नाही.
अट क्रमांक 6 :
आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच मर्यादित असेल. या वेळेनंतर आंदोलकांना आझाद मैदानात थांबता येणार नाही.
अट क्रमांक 7 :
आंदोलकांना मैदानावर स्वयंपाक करण्यास, अन्न शिजविण्यास किंवा कचरा टाकण्यास सक्त मनाई असेल.
अट क्रमांक 8 :
गणेशोत्सवामुळे वाहतूक कोंडी किंवा धार्मिक भावना दुखावणारे प्रकार होऊ नयेत याची विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. तसेच आंदोलनात लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांना सहभागी होऊ देऊ नये, अशी अटही घालण्यात आली आहे.
यातील सहावी अट सर्वात अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. कारण जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला असताना त्यांना फक्त सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आझाद मैदानावर कोणीही थांबू शकणार नाही.
आझाद मैदानाची क्षमता 5000 लोकांची असली तरी जरांगे यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यता आहे. अशावेळी संध्याकाळी सहा नंतर गर्दीचे काय होणार? आंदोलक कुठे जाणार? यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
जरांगे पाटील हे आधीच सरकारवर दबाव वाढवणारे आंदोलन करत आहेत. त्यातच या अटींमुळे संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः सहाव्या अटीवरून संघर्ष तीव्र होऊ शकतो.
आंदोलकांना दिवसाअखेरीस मैदानाबाहेर काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान असेल.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागेल.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि सुरक्षेची तारेवरची कसरत सरकारसमोर उभी राहणार आहे.
जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी येणार आहे. सरकारने दिलेल्या अटींचा जरांगे पाटील स्वीकार करतात का? किंवा या अटींना न जुमानता आंदोलन अधिक तीव्र करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य सरकारने आत्तापर्यंत वेळकाढूपणा केला असा आरोप जरांगे यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळे आता सरकारने ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा, आगामी दिवसांत मुंबईत मोठे चिघळलेले आंदोलन बघायला मिळू शकते.