
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
आझाद मैदानावर सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करताच आंदोलनाची सांगता झाली. या आंदोलनादरम्यान मुंबईत मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली, तर न्यायालयाने या उपोषणाला थेट बेकायदेशीर ठरवले होते.
या काळात जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री नितेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. इतकेच नव्हे तर त्यांनी नितेश राणेंना थेट “चिचुंद्री” असा उल्लेख केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सर्वांच्या नजरा नितेश राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे लागल्या होत्या.
आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की,
“हैदराबाद गॅझेटीयरनुसार निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. मराठा समाजाने गुलाल उधळले तेव्हाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, आणि आज पुन्हा त्यांच्या कार्यकाळातच हे शक्य झाले आहे. त्यामुळे मराठा समाजातील प्रत्येक नागरिकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत.”
मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना उद्देशून केलेल्या “चिचुंद्री” या वक्तव्यावर नितेश राणे यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यांनी जाणीवपूर्वक हा विषय टाळल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
आंदोलनादरम्यान नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना खडेबोल सुनावले.
त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील यांनी त्यांना “चिचुंद्री” असे म्हटले.
एवढेच नाही तर “आंदोलन संपल्यावर नितेश राणेंना बघतोच” असेही जरांगे पाटील म्हणाले होते.
या परस्पर टोलेबाजीमुळे आंदोलनाला केवळ राजकीय रंग चढला नाही, तर मराठा समाजातही चर्चा रंगली होती.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नितेश राणे यांनी फक्त सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून, जरांगे पाटील यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.
राजकीय वर्तुळात मात्र या संघर्षाचा पुढील अध्याय कसा उलगडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.