मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; अजित पवार आणि भुजबळांवर गंभीर आरोप

0
124

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मुंबईतील उपोषण संपल्यानंतर आणि सरकारकडून महत्त्वपूर्ण जीआर जारी होऊन सहा मागण्या मान्य झाल्यानंतर, जरांगे यांनी आता पुन्हा सरकार आणि काही नेत्यांवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, या वेळी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जरांगे पाटील यांनी सांगितले की, “मराठा समाजाने आता सावध राहिले पाहिजे. आरक्षणासाठी लढा संपलेला नाही, तर खरी लढाई आता सुरू झाली आहे. सरकारने जीआर काढला असला तरी त्याची अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवावा लागेल.”


जरांगे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा संदर्भ देत सांगितले की,

“महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज शेती करणारा आहे. आज शेतीवर संकटांचे सावट आले आहे. पाऊस, हवामान आणि बाजारभाव या सर्व गोष्टींनी शेतकरी उद्धवस्थ झाला आहे. बाकी समाजांना शेती आणि नोकरी दोन्ही आधार आहेत, पण मराठा समाजाला एकच आधार — शेती. त्यामुळे शिक्षण आणि नोकरी हा दुसरा आधार मिळाला पाहिजे. आपल्याला शिक्षण आणि नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे आपण ओळखले पाहिजे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “आपल्याला आरक्षणाचा आधार मिळवण्यासाठी आता एकत्र येणे गरजेचे आहे. मराठा आरक्षण टिकवून ठेवण्याबरोबरच, ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, त्या मराठ्यांनाही आरक्षणाचा फायदा मिळवून द्यायचा आहे.”


मनोज जरांगे यांनी राज्यातील काही नेत्यांवर थेट आरोप करताना म्हटले की,

“काही लोकांना मराठा समाज शिक्षित होऊ नये, नोकरीत यशस्वी होऊ नये, हेच पाहायचं आहे. पण मी सांगतो, त्यांनी कितीही डाव टाकले तरी आपण पराभूत होणार नाही. 2029 च्या निवडणुकीत मराठा समाज लक्षात ठेवेल — कोण नेते आपल्या आरक्षणाच्या विरोधात गेले, त्यांना जनता विसरणार नाही.”


शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या विषयावर बोलताना जरांगे म्हणाले,

“आत्महत्येच्या प्रकरणांचा पोलिस तपास दबावाखाली होत असल्याची शंका आहे. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे थांबवा. समाजात असंतोष वाढत आहे आणि सरकारने हे गांभीर्याने घेतले पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळू नका.”


जरांगे यांनी पुढे अजित पवारांच्या गटावर जोरदार हल्ला चढवला.

“अजित पवारांच्या पक्षाचे अनेक नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करत आहेत. छगन भुजबळांचा हेतूच मराठा समाजाचा अपमान करणे आहे. सगळे उठतात आणि बीडमध्ये मोर्चा काढतात. सगळे नेते त्यांचे असतात, सर्व पदाधिकारी त्यांचेच असतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही साप पोसले आहेत. एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल,” असा इशारा जरांगे यांनी दिला.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, मराठा समाजाला विभागण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण हे समाजाच्या एकतेला हादरा देणारे पाऊल आहे. “मराठा समाज आज जागा झाला आहे. आता कोणाच्याही फसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही,” असे ते म्हणाले.


जरांगे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना सांगितले की,

“आपण आता केवळ आरक्षणासाठी नव्हे, तर आपली ओळख, सन्मान आणि अस्तित्वासाठी लढत आहोत. जोपर्यंत समाजाला पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष थांबवणार नाही. सरकारला आणि विरोधकांना हे स्पष्ट संदेश आहे की, मराठा समाज कोणत्याही प्रकारे मागे हटणार नाही.”


मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेले आरोप थेट अजित पवार गटावर आणि छगन भुजबळांवर असल्याने, या वक्तव्याचे पडसाद आगामी काही दिवसांत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here