महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संचालित शिवनेरी बसमध्ये सह-प्रवाशास अंमली पदार्थ पाजणाऱ्या आणि स्वत:ही मद्यपान करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती केवळ प्रवासी नसून, तो कुख्यात गुन्हेगार आहे. युनूस शफीकुद्दीन शेख (वय-52 वर्षे) असे त्याचे नाव आहे. मुंबई येथील माटुंगा पोलीस पथकाने त्याला उत्तर प्रदेशातील मेरठ येथून 8 जुलै रोजी अटक केली. युनूस शेख याने पुणे-मुंबई शिवनेरी बस प्रवासादरम्यान14 जून रोजी त्याने एका जाहिरात एजन्सीच्या मालकाला फसवले. त्यांना अंमली पदार्थ दिले तसेच त्यांच्या मौल्यवान वस्तू लुटल्या. या प्रकारानंतर प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत त्याला ताब्यात घेतले.
मैत्री करुन कॉफी दिली
प्राप्त माहितीनुसार, 56 वर्षीय जाहिरात आणि ब्रँड एजन्सीचे मालक शैलेंद्र साठे, पुण्यातील वाकडहून मुंबईला जाण्यासाठी शिवनेरी बसमध्ये चढले. प्रवासादरम्यान, आरोपीने त्यांच्याशी मैत्री केली आणि खालापूर येथील फूड मॉलमध्ये बस थांबल्यावर त्याला कॉफीचा कप देऊ केला. जो प्राशन केल्यानंतर साठे बेशुद्ध प्रवासादरम्यान पडले. त्याचा फायदा घेत आरोपीने त्यांच्याजवळची सोन्याची आंगठी आणि इतर दागिने, मोबाईल फोन चोरून नेला, असे पोलिसांनी सांगितले.
MSRTC कर्मचाऱ्यांनी फूटपाथवर बेवारस सोडले
मध्य मुंबईतील दादरला पोहोचल्यावर, MSRTC कर्मचाऱ्यांनी साठे यांना दारूच्या नशेत असल्याचे समजून त्यांना बसमधून उतरण्यास मदत केली आणि त्यांना एका फूटपाथवर सोडले. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना ज्या ठिकाणी फुटपाथवर सोडले त्याच ठिकाणी ते कित्येक तास बेशुद्ध पडले. प्रदीर्घ काळानंतर त्यांना शुद्ध आली आणि आपण कोठे आहोत याचे त्यांना भान आले. धक्कादायक घटनेतून थोडेसे सावरल्यानंतर साठे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर 20 जून रोजी माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तपास सुरू करण्यात आला.
‘पुनर्जन्माचा अनुभव’
शैलेंद्र साठे यांनी नंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेचे वर्णन करताना ‘पुनर्जन्माचा अनुभव’ असे केले. ते म्हणाले, “मी 16 तास फुटपाथवर पडून होतो, पाऊस पडत असताना मी बेशुद्ध आणि कोणाचेही लक्ष नसताना फुटपाथवर बेवारस पडलो होतो. मी डिहायड्रेट झालो होतो, पण कोणीही माझी तपासणी करण्याची तसदी घेतली नाही, अगदी MSRTC कर्मचारी ज्यांनी मला बसमधून खाली उतरण्यास मदत केली आणि मला 16 तास फुटपाथवर सोडले. ते सुद्धा नंतर फिरकले नाहीत. सुदैवाने, माझी पत्नी आणि मेहुणे मला वेळेत सापडले. त्यामुळे कसाबसा वाचलो.”
ज्यूपिटर हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचार
दरम्यान, जवळपास 80 तासांहून अधिक काळ बेशुद्धावस्थेत/ गुंगीत असलेल्या साठे यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. त्यांच्यावर ज्यूपिटर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी शिवनेरी बस आणि खालापूर फूड मॉल, दादर आणि मुंबई सेंट्रलसह इतर ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्या आधारे पाहणी केली. त्यांनी दोन संशयितांना ओळखले आणि त्यांचा धागादोरा उत्तर प्रदेशातील मेरठपर्यंत जोडला गेला. मेरठच्या गुजरी बाजार भागात एक पथक रवाना करण्यात आले आणि तीन दिवसांच्या पाळतीनंतर युनूस शेखला पकडण्यात आले. या परिसरात इस्टेट एजंट म्हणून काम करणाऱ्या शेख याच्याकडून पोलिसांनी साठे यांच्याकडील 30 ग्रॅम सोने जप्त केले.
पुढील तपासात उघड झाले की शेख हा मेरठमधील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न आणि जाळपोळ यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रवासादरम्यान ड्रिंक्स पिऊन किंवा ड्रग्ज पाजून प्रवाशांना लुटण्यातही त्याचा सहभाग होता, आंध्र प्रदेशातही अशीच प्रकरणे नोंदवली गेली होती. त्याचेही काही धागेदोरे शेखकडे लागतात का हे पाहिले जात आहे. दरम्यान, अटकेनंतर, शेखला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.