
माणदेश एक्सप्रेस न्युज | मिरज :
मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी थैमान घालत एक मंदिर व तीन घरे फोडली. या चोरीत देवाच्या दागिन्यांसह रोकड, सोने–चांदी असा मिळून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास झाला. एकाच रात्री सलग चार घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनावर गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
मल्लेवाडी येथील मंगोबा मंदिराचे पुजारी विशाल क्षीरसागर हे मंगळवारी पहाटे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता मंदिराचा दरवाजा तुटलेला दिसला. तपासणी केली असता मंगोबा देवाच्या अंगावरचे दागिने गायब असल्याचे आढळले.
चोरट्यांनी देवावरचे सुमारे सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने – दोन तोळ्यांची सोन्याची चेन, सोन्याचे दोन बदाम, अर्धा तोळा सोन्याची पेटी असा ऐवज पळवला. धार्मिक स्थळावरच चोरट्यांचा हात गेल्याने ग्रामस्थांत संताप पसरला आहे.
त्याच रात्री गावातील तिन्ही घरे चोरट्यांनी फोडली.
भास्कर क्षीरसागर यांच्या गोठ्यातील एक शेळी चोरून नेण्यात आली.
प्रदीप भोसले यांच्या घरातून तब्बल ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
पिंटू मल्हारी शिंदे यांच्या घरातून साडेतीन ग्रॅम सोने, एक तोळा चांदी व २० हजार रुपयांची रोकड असा ऐवज पळवला.
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा, पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी पथकासह पाहणी केली. श्वानपथक व गुन्हा शोध पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच इतर तांत्रिक पुरावे गोळा करून चोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
एकाच रात्री मंदिर व घरे फोडल्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. चोरांचा बंदोबस्त करून गावात कडक गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एकूणच मल्लेवाडीत घडलेल्या या चोरीच्या घटनांनी धार्मिक स्थळे व घरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांना अटक करून चोरीचा उलगडा करावा, अशी मागणी होत आहे.