
Chaiwala Funny Pati Viral photo : तुम्ही आजवर अनेक गाड्यांवर, दुकानांवर लिहिलेल्या वेगवेगळ्या पाट्या वाचल्या असतील. अनेकदा या पाट्यांमधून भन्नाट सूचना दिल्या जातात. काही वेळा भावनिक मेसेज असतात, तर काही वेळा लोकांना समजेल अशा तिरकस भाषेत टोमणे लिहिले जातात. सध्या एका चहावाल्याने लिहिलेली अशीच एक पाटी चांगलीच चर्चेत आली आहे. ही पाटी खास चोरांसाठी लिहिण्यात आली आहे, जी वाचून चोर तर हमखास आल्यापावली परत निघून जाईल. सध्या ही पाटी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतोय. ही वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.
रात्रीच्या वेळी बंद दुकानांत चोरीच्या घटना घडताना दिसतात. अनेकदा दुकानफोडी करून चोर असल्या नसलेल्या सर्व गोष्टी चोरून पसार होतात. अशाने दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यात रस्त्यावर धंदा करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचे, टपरीवाल्यांचे तर अधिक नुकसान होते. कारण- चोर चोरीच्या नादात त्यांच्या टपरी, गाडी आणि इतर सामानाचीही पूर्ण तोडफोड करतात. अशाच प्रकारे रस्त्यावर चहा विकणाऱ्या एका चहावाल्याने टपरीवर चोरीची घटना घडू नये यासाठी खास एक पाटी लावली आहे, जी आता अनेकांचे लक्ष वेधून घेतेय. ही पाटी वाचून कोणीही चोर या टपरीत चोरीचा विचार करणार नाही, तसेच ते आल्या पावली ते माघारी फिरतील. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.
आता तुम्ही विचार करत असाल की, एवढं काय लिहिलं आहे या पाटीवर, तर या टपरीवरील पाटीवर लिहिलं आहे की, चोरासाठी महत्त्वाची सूचना. या टपरीवरील सर्व सामान घरी नेले आहे, त्यामुळे आपला रात्रीचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नये. आपण लॉक तोडल्यावर वेल्डिंगला ५०० रुपये खर्च येतो.
तुम्ही आतापर्यंत पुण्यात अशा भन्नाट पाट्या वाचल्या असतील. पण पुणेरी पाट्यांची ही क्रेझ आता सगळीकडेच पाहायला मिळते. या पाट्यांमधून कमी शब्दांत समोरच्याला कळेल अशा भाषेत शालजोडीतले देण्याची कला पुणेकरच साधू शकतात; पण त्यांच्या या कलेचे आता महाराष्ट्रात अनेक जण अनुकरण करताना दिसतात.