
माणदेश एक्स्पेस/बद्रीनाथ : वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. उत्तराखंडमध्ये सखल भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे शुक्रवारी दुपारी मोठी नासधूस झाली. प्रचंड हिमवृष्टीनंतर ग्लेशियर तुटले. त्यामुळे 57 मजूर बर्फाखाली गाडले गेले. मात्र, रेस्क्यू करुन 16 मजुरांना वाचवण्यात यश आले आहे.
चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळ 57 मजूर हिमनदीखाली गाडले गेले. मात्र, 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित 41 मजुरांचा शोध सुरू आहे. लष्कराच्या वाहनांना जाण्यासाठी रस्त्यावरील बर्फ हटवणारे 57 मजूर घटनास्थळाजवळ असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत अद्याप कुठलीही मनुष्यहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. लष्करासोबतच ITBP, NDRF, SDRF च्या बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
चमोलीच्या वरच्या भागात अनेक दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. हवामान खात्याने याआधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. 3200 मीटरच्या वरच्या भागात बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता होती. हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. आता बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर महामार्गाजवळ हिमस्खलन झाले आहे. त्यात 57 मजूर अडकले. त्यापैकी 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे.