महिलांसाठी सरकारकडून दिवाळी गिफ्ट – ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता लवकरच बँकेत

0
255

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर 2025 महिन्याचा सन्मान निधी उद्यापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी मोठी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. यामुळे राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळणार आहे.

ही घोषणा त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वरून केली. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात प्रत्येकी 1500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे. अनेक महिलांनी दिवाळीपूर्वी या रकमेची वाट पाहत होत्या. अखेर त्यांना यंदाच्या सणासुदीच्या काळात हप्ता मिळणार असल्याने आनंदाची लाट पसरली आहे.

“माझी लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत नसून, ती महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे,” असे म्हणत मंत्री तटकरे यांनी महिलांना अभिनंदन दिले.


राज्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपली E-KYC प्रक्रिया पुढील दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे. मागील महिन्यापासून या प्रक्रियेसाठी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर सुविधा सुरू करण्यात आली आहे.

त्यांनी सांगितले की, “ही योजना अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. पात्र महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून आपला हप्ता वेळेवर मिळवावा.”


  1. मोबाईल किंवा संगणकावर ladakibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उघडा

  2. लॉगिन झाल्यावर ‘E-KYC’ पॉपअप दिसेल — त्यावर क्लिक करा

  3. आधार क्रमांककॅप्चा कोड टाका

  4. आधार प्रमाणीकरणासाठी मंजुरी द्या आणि Send OTP वर क्लिक करा

  5. आधारशी लिंक मोबाईलवरील OTP टाका आणि Submit करा

  6. नवीन नियमानुसार पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP नमूद करा

  7. लाभार्थी महिला असल्यास, स्वतःचा जात प्रवर्ग (Category) निवडा

  8. आवश्यक घोषणापत्रावर (Declaration) क्लिक करा

  9. सर्व माहिती एकदा तपासा आणि Submit बटण दाबा

  10. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर “E-KYC Verification Successful” असा संदेश दिसेल


माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ऐतिहासिक योजना आहे,” असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
या योजनेमुळे राज्यातील लाखो महिला आर्थिकदृष्ट्या बळकट होत असून, ग्रामीण भागातील बहिणींना याचा सर्वाधिक फायदा होत आहे.


दिवाळीपूर्वीच हा हप्ता खात्यात जमा झाल्याने महिलांना केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक दिलासा मिळेल. घरखर्च, सणाच्या खरेदीसाठी आणि बचतीसाठी ही रक्कम उपयुक्त ठरणार आहे.

राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, सरकारकडून वेळोवेळी निधीवाटपाची प्रक्रिया नियमित केली जात आहे.


ज्या महिलांनी अजून E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी पुढील दोन महिन्यांत ती पूर्ण करावी. अन्यथा आगामी हप्त्याचा लाभ मिळण्यात अडथळा येऊ शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here