
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथके काम करत होती. त्याचे लोकेशन मिळाल्यानंतर विशेष मोहिम राबवत त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली.
वैष्णवी हगवणे या तरुणीने आत्महत्या केल्याप्रकरणात निलेश चव्हाणवर गंभीर आरोप होते. वैष्णवीच्या चुलत्यांना धमकावणे, मानसिक छळ आणि अन्य गंभीर गुन्ह्यांत त्याचे नाव समोर आले होते. घटनेनंतर निलेश पसार झाला होता आणि तो परराज्यात लपल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सतत पाठपुरावा करत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तो नेपाळमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून त्याला ताब्यात घेतले असून लवकरच त्याला भारतात आणण्यात येणार आहे. या कारवाईमुळे वैष्णवीच्या कुटुंबीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून पोलिसांच्या या तडफदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.