
माणदेश एक्सप्रेस न्यूज | फलटण :
फलटण शहर हादरवून सोडणाऱ्या महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात आता शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कामात प्रचंड कुशल, कर्तव्यनिष्ठ आणि शांत स्वभावाच्या संपदा मुंडे यांच्या या अकस्मात मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर उघड झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, त्यांनी रात्री अंदाजे दीड वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संपदा मुंडे या फलटण शहरात एका रूमवर किरायाने राहत होत्या. मात्र, आत्महत्या त्यांनी स्वतःच्या राहत्या ठिकाणी न करता थेट शहरातील एका हॉटेलमध्ये केली. विशेष म्हणजे, त्यांनी हे हॉटेल दोन दिवसांसाठी स्वतः बुक केले होते. या कालावधीत त्या नियमितपणे रूग्णालयात ड्युटीवर जात होत्या. म्हणजेच, त्यांच्या मनात काही गंभीर विचार आधीपासूनच चालू होते का, यावर आता संशय निर्माण झाला आहे.
संपदा मुंडे यांनी मृत्यूपूर्वी हातावरच लिहिलेल्या नोटमध्ये दोन व्यक्तींची नावे नमूद केली आहेत — पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर. या नोटमध्ये पीएसआय बदने यांनी चार वेळा बलात्कार केला, तसेच प्रशांत बनकर यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडवली आहे.
या प्रकरणात पुढे रणजीत निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यांवरही अप्रत्यक्ष आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या आत्महत्येला आता राजकीय वळण लागले आहे. स्थानिक पातळीवरून राजकीय दबाव, पोलिस यंत्रणेतील गुंतागुंत आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या धाग्यांवरून या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, संपदा मुंडे यांच्या मृत्यूचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात शरीरावर कोणत्याही प्रकारचा बाह्य मारहाणीचा ठसा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यू गळफास लावून झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. मात्र, हे निष्कर्ष प्राथमिक असून, अंतिम अहवाल आल्यानंतरच अधिकृतपणे कारण निश्चित केले जाईल, असेही पोलिसांनी नमूद केले.
काल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. तथापि, शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. मात्र, डॉक्टर संपदा मुंडे यांनी मृत्यूपूर्वी केलेले गंभीर आरोप तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
संपदा मुंडे या फलटण येथील वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या अत्यंत मेहनती, जबाबदार आणि संवेदनशील डॉक्टर म्हणून ओळखल्या जात. त्या २४ तास ड्युटी करून पुढील २४ तास अभ्यासासाठी वेळ राखत असत. त्यांच्या कार्यकाळात एकाही रुग्णाने त्यांच्याबाबत तक्रार केली नव्हती. त्यामुळे त्यांची आत्महत्या ही सर्वांना धक्का देणारी ठरली आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या हालचालींचा तपास सुरू आहे. संपदा मुंडे यांनी दिलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी आणि त्यांचा साथीदार या दोघांवर गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. याशिवाय, संपदा मुंडे यांचा मोबाईल फोन, डायरी, तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत.
या घटनेनंतर फलटण शहरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे. “एका जबाबदार डॉक्टरला एवढ्या मानसिक छळाला सामोरं जावं लागलं, हे आपल्या समाजासाठी लाजिरवाणं आहे,” अशा भावना व्यक्त होत आहेत.
संपूर्ण तपास सीआयडीकडे द्यावा, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, आणि डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, अशी मागणी आता राज्यभरातून होत आहे.


