
माणदेश एक्सप्रेस न्यूज | संभाजीनगर
महायुतीमधील पक्षांमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या आरोपांवर भाजप विधानपरिषद आमदार संजय केनेकर यांनी शिवसेना नेते संजय शिरसाट यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. “कार्यकर्त्यांचा पक्षबदल ही स्थानिक पातळीवरील बाब आहे. त्याला एवढं मोठं राजकीय स्वरूप देण्याची गरज नाही. ही बाब एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्यायोग्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका केनेकर यांनी मांडली.
संजय शिरसाट यांनी आज असा आरोप केला होता की, “शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अलिखित करार असूनही संभाजीनगरमध्ये पैशांच्या जोरावर फोडाफोडी सुरू आहे. याचा अहवाल आम्ही थेट शिंदे साहेबांना देणार आहोत.” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केनेकर म्हणाले, “आम्ही कोणालाही घरातून जाऊन आणलेलं नाही. कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही. आपले काही लोक जर महायुतीतील दुसऱ्या पक्षाकडे जात असतील, तर विरोधकांकडे जाण्यापेक्षा ते बरेच आहे.”
ते पुढे म्हणाले की, “काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे गटाकडे जाण्यापेक्षा महायुती हा आपला परिवार आहे. अनेक वर्षे आपल्यासाठी काम करणारी माणसं महायुतीतच राहिली पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे. कोणी नाराज होत असेल तर त्यांना समजावून सांगतो आणि महायुतीत राहण्याचे आवाहन करतो.”संजय शिरसाट यांच्यासोबत आमचा चांगला समन्वय असून खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांमुळे आमच्यात वैमनस्य निर्माण होईल असं मला वाटत नाही, असंही केनेकर यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही अजिबात कोणाला फोडलेलं नाही”
केनेकर यांनी ठाम शब्दांत सांगितलं की, “अशा पक्षप्रवेशामुळे महायुतीला कोणतंही नुकसान होणार नाही. आम्ही कोणालाही फोडलेलं नाही, ओढून आणलेलं नाही किंवा बळजबरी केली नाही.” यावेळी त्यांनी राजेंद्र जंजाळ यांच्याबाबत बोलताना टोमणाही लगावला. “जंजाळ काही नाराज नाहीत. त्यांचं शिरसाट यांच्यासोबत चांगलं चाललं आहे. ते दोघं एक नाण्याच्या दोन बाजू आहेत,” असं म्हणत त्यांनी राजकीय मिश्कील टीका केली.


