
माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई –
महाराष्ट्रात सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून मराठवाडा आणि विदर्भातील शेकडो गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे. आज (२३ सप्टेंबर) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घ्यावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली. “राज्यात पावसाने झोडपून काढले आहे, तरीही पालकमंत्री अद्याप जिल्ह्यांमध्ये परिस्थितीचा आढावा घ्यायला गेलेले नाहीत. या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांना आणि जनावरांना सुरक्षित स्थळी हलवणे तातडीने आवश्यक आहे. गरज पडल्यास अतिरिक्त NDRF च्या तुकड्या तैनात कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली.
शेतकरी पिकविम्याचा फायदा घेण्यात अपयशी ठरत असून, त्यातून अपेक्षित मदत मिळत नाही, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले. “निवडणुकीपूर्वीचा जीआर लक्षात घेऊन शेतकऱ्यांना थेट मदत द्यावी. प्रति हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, कारण शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत,” असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत बीड, धाराशिव, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात अक्षरश: पूरस्थिती निर्माण झाली. प्रकल्पांमधून पाणी विसर्ग सुरू झाल्याने गावोगाव पाणी शिरले असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उरलीसुरली पिकेही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत राज्यातील तब्बल ५ हजार ३२० गावांतील पिकांचा चिखल केला आहे. २२ सप्टेंबरला एका दिवसात तब्बल ७५ महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदली गेल्याचा विक्रम झाला. गेल्या दोन दिवसांत विविध जिल्ह्यांतील २२ गावांचा संपर्क तुटला असून, ७० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
निर्णयावर राज्याचे लक्ष
या गंभीर पार्श्वभूमीवर आजची मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची मानली जात आहे. वडेट्टीवार यांची मागणी मान्य करून सरकार ‘ओला दुष्काळ’ जाहीर करते का, याकडे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.


